Saturday, 9 November 2013

ईश्वर - पूजन

संतांच्या विभूती , जगाच्या कल्याणा
अवतार घेती , देतात प्रेरणा ||

लोकांच्या उद्धारा , जीवन साधना
देव शक्ती देतो , करता प्रार्थना || १ ||

ईश्वराच्या साठी , जीव तळमळे
दु:खिता पाहुनी , मन कळवळे ||

ईश्वर दर्शन , हाच एक ध्यास
सत्य त्यास कळे , लोपतसे भास || २ ||

एक ज्यास भूक , एकच तहान
थेंब अमृताचा , करितो पावन ||

भेटताच देव , नुरे देहभान 
ईश्वराचे प्रेम , नलगे साधन || ३ ||

भेटे माणसात , ज्याला भगवंत
तोच भाग्यवंत , आणि साधुसंत ||

शरण मनात , प्रेमभाव आर्त
मूर्ती लागतात , पूजण्या अमूर्त || ४ ||

भारावते मन , मस्तक लवते
कंठही दाटतो , हृदय द्रवते ||

स्वप्न जीवनाचे , जेंव्हा सत्य होते
दिव्य तोच क्षण , दैवत लाभते || ५ ||

बोलणे अमृत , ज्ञानाचेच सार
प्रेमाचा वर्षाव , नसे अहंकार ||

मूर्तीमंत प्रेम , दयेचा सागर
प्रगट रुपात , तो परमेश्वर || ६ ||

आचार-विचार , आदर्श प्रेरक
तेजस्वी स्वरूप , तो मार्गदर्शक ||

आदर,सेवेचा , करता स्वीकार
जन्मोजन्मी ऋण , नाही फिटणार || ७ ||

पाहताच वाटे , जावे त्या शरण
विनम्र मनाने , द्यावे पंचप्राण ||

त्याच्याच रुपात , असे भगवंत
प्रचिती मिळते , माध्यम दैवत || ८ ||

त्याच्या दर्शनात , आनंद अपार
त्याच्या असण्यात , अस्तीत्व आधार ||

लाभताच दृष्टी , देव दिसे सृष्टी
त्याची कृपादृष्टी , अमृताची वृष्टी || ९ ||

अनुभवामृत , प्रत्यक्ष प्रमाण
सत्यसाक्षात्कार , देवाचं भेटण ||

व्याकुळता प्राण , लाभते दर्शन
परिसाचा स्पर्श , जीवनाच सोन || १० ||

मन मंदिरात , दैवत पूजन
श्रद्धा नि सबूरी , देता त्यास दान ||

करितो सांभाळ , सद्गुरू प्रेमळ
तर्क,वाद थांबे , मन हो निर्मळ || ११ ||

करायचे काही , राहतच नाही
मागावेसे काही , वाटतच नाही ||

मिळायचे काही , उरतच नाही
त्यास मन वाही , दुजे रूप नाही || १२ ||

क्षणोक्षणी भेटे , ईश्वर साकार
आनंदच वाटे , सृष्टी चराचर ||

अंतर्बाह्य दाटे , आगळा प्रकाश
नूरे भेद कोठे , धरती आकाश || १३ ||

चांदण्याची वर्षा , ओले चिंब मन
चित्तही प्रसन्न , तन मन धन ||

दैवता अर्पून , सुख समाधान
शांती लाभे तेच , ईश्वर पूजन || १४ ||

३०.०४.१९८४ - ०१.०५.१९८४ 











No comments:

Post a Comment