Saturday, 9 November 2013

ईश्वर - दर्शन

विश्वाचा नियम , न्याय संतुलन
चालका जाणून , प्राप्त होते ज्ञान ||

आत जे जे आहे , बाहेरही आहे
जगाच्या खेळाचे , सूत्र एक आहे || १||

कुणाच्या ईशारे , वाहतात वारे
फिरतात सारे , सूर्य,चंद्र,तारे ||

कितीही घेतला , शब्दांचा आधार
वर्णन अपूर्ण , निर्गुण साकार || २ ||

आदि अंत नाही , राही चिरंतन
विश्वाचा पसारा , तोच सांभाळून ||

तो प्राणिमात्रांत , विशाल सूक्ष्मात
राही निसर्गात , होऊनी संगीत || ३ ||

त्याचाच आवाज , हृदयात आहे
श्वास,मन आहे , सर्वसाक्षी आहे ||

निजवितो तोच , जाग आणि तोच
चालवितो तोच , करवितो तोच || ४ ||

सुगंध फुलात , त्याच्यामुळे आहे
लहान मुलात , निरागस आहे ||

हास्यात,अश्रूत , तोच एक आहे
कर्तव्य कर्मात , प्रेमभाव आहे || ५ ||

काव्य लेखनात , स्फूर्ती तोच आहे
मंदिरात त्याच्या , मूर्ती तोच आहे ||

स्वर संगीतात , सूरताल आहे
शरीर मनाच्या , सौंदर्यात आहे || ६ ||

अध्यात्म विज्ञानी , तल्लीनता आहे
कार्य करण्यात , शक्ती तोच आहे ||

शब्द,रस रंग ,  अर्थ ज्ञान आहे
मार्ग तोच आहे , साध्य तोच आहे || ७ ||

धान्य उगवितो , शेतकरी तोच
पाऊस पाडतो , जादुगार तोच ||

सृष्टी बगीचाचा , बागवान तोच
पर्वत,सागर , निर्माताही तोच || ८ ||

इंद्रधनुष्याच , रंगकाम त्याचं
फुलपाखराच , नक्षीकाम त्याचं ||

निसर्ग चित्राचा , चित्रकार तोच
शरीर मनाचा , शिल्पकार तोच || ९ ||

जगाच्या रथाचा , सारथीही तोच
जीवन नौकेचा , नावाडीही तोच || 

जीवन नाट्याचा , दिग्दर्शक आहे
जीवन प्रवासी , सांगाती तो आहे || १० ||

बाल मुखातून , बोलतो तो आहे
हाक मारी त्यास , प्रतिसाद आहे ||

दृष्टी ज्यास लाभे , तोच त्यास पाहे
दूर नको शोध , जवळ तो आहे || ११ ||

जेथून जे येते , त्याला ते मिळते
नित्य ते असते , रूप बदलते ||

अंतरंगी आहे , अंतराळी आहे
ईश्वर दर्शन , क्षणोक्षणी आहे || १२ ||

अव्यक्तास व्यक्त , अशक्ता सशक्त
करण्यास होतो , ईश्वरच भक्त ||

नकोच पुरावा , आहेच तो सिद्ध
जाताच दुरावा , मुक्त होई बद्ध || १३ ||

दुग्ध शर्करेचा , आपोआप योग
भाव शब्द झाले , एकरूप रंग ||

विचार मंथनी , नवनीत पद
स्वाद नि आस्वाद , कृपेचा प्रसाद || १४ ||

३०.०४.१९८४ - ०१.०५.१९८४








No comments:

Post a Comment